सिल्लोड, (प्रतिनिधी) विकसित भारत संकल्प २०४७अंतर्गत सिकलसेलमुक्त महाराष्ट्रचे ध्येय या विशेष कार्यक्रमांतर्गत सिल्लोड तालुक्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान अरुणोदय विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
सिल्लोड तालुक्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर खान पठाण यांनी दिली आहे. राज्यातील सिकलसेलचा जास्त प्रसार असलेल्या २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, कन्नड, वैजापूर या चार तालुक्यांमध्ये सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने, सिल्लोड तालुक्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
या मोहिमेत शून्य ते ४० वयोगटातील ज्या नागरिकांची अद्याप तपासणी झालेली नाही, त्यांचे मिशन मोडवर स्क्रिनिंग केले जाणार आहे. मोफत सुविधा तपासणी, उपचार, समुपदेशन आणि गरज भासल्यास मोफत रक्त संक्रमण, विवाहपूर्व समुपदेशन केले जाणार आहे.
सिल्लोड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४५ उपकेंद्रे येथे तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी १५ वैद्यकीय अधिकारी, ३४ समुदाय आरोग्य अधिकारी, २५० ग्रामीण व ३० शहरी अशा एकूण २८० आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत.














